महिला दिन विशेषः ललिता भोयर यांची मुलाखत
विविध प्रकारच्या कला जोपासणाऱ्या कलाकारांचा आणि कलाप्रेमींचा एक समूह म्हणजे आर्ट लव्हर्स ग्रुप, अर्थात ‘अल्ग-ओ-ऱ्हिदम’तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने कलाक्षेत्रातील महिलांशी संवाद साधण्यात आला. या महिला कलाकारांच्या कलेबद्दल, त्यांच्या घडण्याच्या आणि घडवण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया या मुलाखतींच्या मालिकेतून…
आजच्या कलाकार आहेत, ‘क्ले कल्ट’ या नावाने टेराकोटा दागिन्यांवर काम करणाऱ्या ललिता भोयर. बदलापूर, ठाणे येथे राहणाऱ्या ललिता भोयर कन्टेन्ट रायटींग, स्क्रीन प्ले रायटींग अशी कामे करतात. पण टेराकोटा माध्यमामध्ये त्या करत असलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या कामाबद्दल जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून.
प्रश्न: ‘टेराकोटा ज्वेलरी’ या कला प्रकारामध्ये कामाची सुरुवात कशी झाली?
ललिता: चार-पाच वर्षांपूर्वी माझे सासरे गणपती बनवायच्या एका वर्कशॉपमध्ये भाग घ्यायला गेले होते. तिथं त्यांनी गणपतीची एक अतिशय सुंदर मूर्ती बनवली. ती मला खूप आवडली. ते मला म्हणाले, तू बनवू शकशील, ट्राय कर. मी विचार केला, ट्राय करायला काय हरकत आहे? पण त्यानंतर एक-दोन वर्षे अशीच गेली. आपल्याला असं काही करायला जमलं नाही तर काय, असे विचार मनात आले; पण धाडस करून माती आणली आणि युट्युबवर वेगवेगळे व्हिडिओ बघून प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये छान मूर्ती तयार करता आली. अपेक्षेपेक्षा जास्त छान मूर्ती तयार झाली. मग युट्यूबवर यासंबंधी व्हिडिओ बघता-बघता ‘टेराकोटा ज्वेलरी’चा व्हिडीओ समोर आला आणि तो प्रकार फार आवडला. ज्वेलरी बनवणं व्हिडीओत बघून सोपं वाटलं, म्हणून बनवायला सुरुवात केली. तितकं सोपं नाहीये अर्थात, पण जमलं.
प्रश्न: या कलाप्रकारामध्ये तुम्ही कोणाला गुरु मानता?
ललिता: युट्यूब हाच माझा गुरु आहे. त्याच्याकडूनच वेगवेगळ्या प्रकारचे मणी बनवणं, पेन्डंट बनवणं, रंग देण्याचं टेक्निक, ज्वेलरी भाजायची प्रक्रिया, असं सगळं एक-एक करत शिकत गेले.
प्रश्न: या कलेचं व्यवसायात रूपांतर होऊ शकतं हे केव्हा लक्षात आलं?
ललिता: टेराकोटा ज्वेलरीचे पहिले एक-दोन सेट मी स्वतःसाठीच बनवले आणि ते फेसबुकवर पोस्ट केले. ते बघून सगळ्यांनी कौतुक तर केलंच, पण त्यातून ऑर्डरसुद्धा मिळाल्या. मग म्हटलं, करायला काय हरकत आहे? करून बघूया. म्हणून ऑर्डर पूर्ण केल्या. या ऑर्डर पूर्ण झाल्यावर कस्टमर्सनी रिव्ह्यू लिहिले आणि त्यातून अजून काम येत गेलं.
प्रश्न: सध्या हे काम कशाप्रकारे चालू आहे?
ललिता: आधीच्या कस्टमरच्या रेफरन्समधून ऑर्डर्स येतात, त्या कस्टमाईज करून देते. त्यासाठी कस्टमरकडून साड्यांचे, ड्रेसचे फोटो मागवून घेते. मग त्यांच्याशी चर्चा करून पेन्डंटचा आकार, रंगसंगती, लांबी, वगैरे ठरवते. त्यानुसार प्लॅन करून मी दागिने बनवून देते. एखादं प्रदर्शन असेल तर मी जास्तीची ज्वेलरी बनवते, पण शक्यतो तयार काहीही ठेवत नाही. ऑर्डरप्रमाणेच बनवून देते.
प्रश्न: ‘टेराकोटा’संबंधी काही फॉर्मल शिक्षण घेतलं आहे का?
ललिता: नाही, मी यातलं कुठलंही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नाही. याबद्दल ऑनलाईन शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की, ‘टेराकोटा ज्वेलरी’ साऊथला जास्त वापरली जाते. तिकडचे व्हिडीओ बघून शिकताना भाषेची अडचण वाटली. माझं या क्षेत्रात कुठलंही फॉर्मल एज्युकेशन झालं नसल्यामुळे मला चौकटीत अडकायला होत नाही; खूप एक्स्प्लोर करता येतं.
प्रश्न: ‘टेराकोटा ज्वेलरी’बद्दल काय सांगाल?
ललिता: टेराकोटा ज्वेलरी बघून जड दिसते. मातीचे दागिने म्हटल्यावर ते जड असणार असं वाटू शकतं. एअर ड्राईड ज्वेलरी जड असते पण भाजल्यानंतर तिचं वजन कमी होतं. अगदी सहज कॅरी करता येईल इतपतच वजन असतं. मातीतून पाण्याचा अंश निघाला की ज्वेलरी हलकी होते. फक्त दिसायला ती मोठी दिसते.
प्रश्न: या कलाप्रकारामध्ये काम करायची प्रेरणा कुणाकडून मिळाली?
ललिता: मी बनवलेली पहिली गणपतीची मूर्ती. नेहमीच्या रुटीन आयुष्यातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं करण्याची ऊर्जा मला या कामातून मिळते. आणि माझे इंस्पिरेशन माझे कस्टमर्स आहेत; कारण ते इतके सुंदर-सुंदर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात, त्यातूनच नवीन काहीतरी करायची ऊर्जा मिळते.
प्रश्न: या कामाबद्दल भविष्यात काय प्लॅन्स आहेत?
ललिता: ‘टेराकोटा ज्वेलरी’मध्ये अजून बरंच एक्सप्लोर करायचं आहे. त्याच बरोबर मातीची भांडी, नेम प्लेट असं बरंच काही बनवायचा विचार आहे. ‘क्ले कल्ट’ हा ब्रँड रजिस्टर करायचा आहे. मी हे काम सध्या घरातूनच करते; पुढे जाऊन एक स्टुडिओ करायचा विचार आहे.
प्रश्न: या किंवा कोणत्याही कला क्षेत्रामध्ये नव्याने धडपड करणाऱ्या कलाकारांसाठी काय सल्ला द्याल?
ललिता: कुठलंही नवीन काम करताना ते आपल्याला जमेल की नाही याचा विचार करू नका. काहीही अशक्य नाहीये. काम सुरू केलं की त्याच्या संबंधी दहा मार्ग दिसू लागतात. त्यामुळं जमेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा बिनधास्त करून बघा. आपल्या आवडीचं काम असेल तर यश येतंच आणि आनंद हा बोनस त्यावरचा...
ललिता भोयर यांना आर्ट लव्हर्स ग्रुप, अर्थात ‘अल्ग-ओ-ऱ्हिदम’तर्फे महिला दिनाच्या आणि ‘क्ले कल्ट’चे काम वाढवत नेण्यासाठी अनेक शुभेच्छा!
अल्ग-ओ-ऱ्हिदम टीम
Comments
Post a Comment